Ahmednagar Politcs : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राजकीय स्थिती चांगलीच तापली आहे. येथील आमदार रोहित पवार हे कार्यरत असतानाच आ. राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली.
त्यामुळे आता या दोघांमधील राजकीय संघर्ष वाढला आहे. काही काळ शांत असणार आ. शिंदे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. एमआयडीसीच्या मुद्द्यावरून दोघांत शीतयुद्धे सुरूच आहेत.
आता पुन्हा एका आपल्या गावरान भाषेत आ. राम शिंदे यांनी आ. पवार यांच्यावर घणाघात केला आहे. रातच्याला ध्यानात आलं की आता इथं मजा नाही तर गडी कव्हाबी पळून जाईल असे ते म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले आ. राम शिंदे
मागील तीन वर्षांपूर्वी मतदारसंघातील परिस्थिती वेगळी होती. पण आता कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आलयं की, आपला गडी त्यो आपलाच असतोय. लय बाहेरचा गडी कामाला ठेवून, त्यो कधी गबाळ घेऊन जाईल, याचा भरवसा नाही.
रातच्याला त्याच्या ध्यानात आलं की आता इथं काही मजा नाही. त्यो गडी कव्हा पळून जाईल, सांगता येत नाही. गावातला गडी निघून गेला, तर त्याला समजावून सांगता येतं, पण युपी-बिहारचा गडी रातच्याला निघून गेल्यावर कुठून आणायचा?
त्यामुळं आपला गडी गडी कामाचाय, चांगलाय. कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून उतरवलं नाही, पण जे लोकांना फुकटचा मानसन्मानही देऊ शकत नाहीत,
अशी माणसं काय काम करणार, अशा शब्दांत मोठा घणाघात आमदार प्रा. राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता केलाय.
आ. राम शिंदे यांचे विविध दौरे
कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक गावांत आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ठेवले आहेत. ३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील हळगाव, बावी, खांडवी, जामखेड, रत्नापूर, पाटोदा, डोणगाव येथे शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी पवारांवर निशाणा साधला. तसेच येणाऱ्या काळात बाहेरच्या कोणाच्या नादाला लागू नका, मागची चूक आता करू नका असे म्हटले आहे. या भागातल्या, परिसरातल्या अडचणी माझ्याएवढ्या कोणालाच माहित नसल्याने त्या मी सोडवणार आहे असे ते म्हणाले.
एमआयडीसीवरून शीतयुद्धे
एमआयडीसी मुद्द्यावरून आ. राम शिंदे व आता. रोहित पवार यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरु आहे. आ. पवार यांनी या मुद्द्यावरून विविध राजकीय आरोप शिंदे यांच्यावर केले आहेत. तसेच शिंदे देखील एकही संधी प्रत्यारोप करण्याची सध्या सोडत नसल्याचे चित्र आहे.