Ahmednagar Politics : शरद पवारांचा मोठा डाव ! विखेंच्या मैदानात पवारांची एन्ट्री, विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला लावणार सुरंग ?

Tejas B Shelar
Published:

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तसेच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे विरोधात असलेल्या नेते मंडळीने देखील आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मैदान तयार करण्याला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख आणि राजकारणातील चाणक्य म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनी देखील आता आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे यावा यासाठी शरद पवारांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. खरे तर 2019 च्या निवडणुका झाल्यात आणि यामध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आलेत.

यामुळे नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार गटाकडे चार आमदार गेलेत. परिणामी शरद पवार गटाची आता या ठिकाणी पकड कमजोर झाली आहे. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी आणि नगर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार निवडून यावेत यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे.

यासाठी 3 व 4 जानेवारी 2024 ला शिर्डी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शरद पवार आगामी निवडणुकीसाठी रणसिंग फुंकणार आहे. खरे तर शिर्डी हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गड म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विखे पाटील यांची मोठी पकड असल्याचे बोलले जाते.

संपूर्ण नगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघावर विखे यांची चांगली पकड असल्याचे जाणकार लोक सांगतात. हेच कारण आहे की पुन्हा एकदा राष्ट्रवादी उभारणीसाठी शरद पवारांनी शिर्डी येथे शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिरांच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कोणाला उभ करावं या गोष्टीची देखील चाचपणी होण्याची शक्यता आहे. यामुळे या शिबिराकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे आणि राजकारणातील जाणकार लोकांचे विशेष लक्ष लागून आहे.

एकंदरीत राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापूर्वी जशी राष्ट्रवादीची अहमदनगर जिल्ह्यावर पकड होती तशीच पकड पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे यावी यासाठी शरद पवारांच्या माध्यमातून आता रणसिंग फुंकले जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe