Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे आज व उद्या दोन दिवस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिबीर आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने व अजित पवारांच्या बंडानंतरचे हे महत्वाचे शिबीर ठरणार आहे. या शिबिराला शरद पवारांच्या सोबतचे सर्व पदाधिकारी असणार असून मोठे नियोजन येथे होणार आहे.
परंतु या शिबिराला आ. रोहित पवारांची गैरहजर सर्वांच्याच भुवया उंचवणारी ठरली आहे. ते अनुपस्थित असल्याने त्यांच्यात व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात कलह निर्माण झाला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
परंतु आता या नंतर इकडे स्वतः जयंत पाटील यांनी रोहित पवार का आले नाहीत याबाबत खुलासा केला तर तिकडे स्वतः आ. रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहीत शिबिराला गैरहजर असण्याचे कारण देत खुलासा केला.
काय म्हणाले जयंत पाटील?
रोहित पवारांच्या गैरहजेरीबाबत चर्चा रंगल्या असतानाच आता जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. रोहित पवार परदेशात असल्यामुळे ते या शिबिराला आले नाहीत. आज संध्याकाळपर्यंत ते शिबिरात येतील. शिबीराची तारीख ठरल्यानंतर त्यांनी मला याबाबत आधीच कळवले होते असेही ते म्हणालेत.
आ. रोहित पवार यांनी काय केला खुलासा?
आ.रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत गैरहजेरीबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असून सध्या सुरु शिर्डीमध्ये असेलल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला मला येत आले नाही. याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली असून
इतरांनी राजकीय गैरअर्थ काढू नये असे आ. रोहित पवारांनी म्हटलं आहे. आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढणार आहोत व जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिबिरास कुणाकोणाची उपस्थिती?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हेमंत टकले, राज्यसभा खासदार फौजिया खान, आमदार अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, आमदार बाळासाहेब पाटील,
आमदार अरुण लाड, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची आजच्या पहिल्या दिवशी उपस्थिती होती.