Garlic Prices in Maharashtra : महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. मसाल्याच्या पदार्थाबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीतला महत्वाचा घटक असलेल्या लसणाची फोडणी महागली असून, लसूण चांगलाच भाव खात आहे.
घाऊक बाजारात लसणाची आवक घटल्याने लसणाच्या दरात वाढ झाली आहे. राज्यात लसणाचे उत्पादन घटले असून, परराज्यातील आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात लसणाचे दर १५० ते २५० रुपयांवर पोहचले असून,
किरकोळ बाजारात हेच दर २६० ते ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत. महाराष्ट्रातील गावरान लसणाच्या लागवडीत गेल्या काही वर्षापासून घट झाली आहे, त्यामुळे परराज्यातील लसूणउत्पादनावर अवलंबून राहावे लागत आहे.
आजमितीला सर्वच बाजारपेठेत परराज्यातील आवक कमी झाली असून, शहरे व उपनगरातून लसणाला मोठी मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणात होत असल्याने लसणाचे दर वधारले आहेत.
स्वयंपाक रुचकर बनवण्यासाठी कांदा व लसण, यांची आवश्यकता असते, त्यांच्या फोडणीनंतरच स्वयंपाक चविष्ट बनतो. आता लसणाचे भाव किरकोळ बाजारात ३०० रुपयांवर पोहचल्यानंतर लसणाची फोडणी महागली आहे.
नवीन लसूण बाजारात येण्यास असून, एक ते दीड महिन्याचा अवकाश आहे. लसणाचा नवीन हंगाम सुरु होईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. त्यामुळे गृहिणींना संसाराचा गाडा काटकससरीने हाकावा लागत आहे.