Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात आता यंदाच्या निवडणुकांत अनेक बदल दिसतील. शिवसेनेतील व राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अनेक गोष्टी वाटत असल्या तरी तितक्या सोप्या नसतील. शिर्डी मतदार संघाची जागा सध्या शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे आहे.
ते शिंदे गटात आहेत. परंतु मागील लोकसभेपासूनच त्यांच्याविरोधात नाराजगी आहे. तसेच हा मतदार संघ आता शिंदे गटाला दिला जाणार नाही असे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी राजकीय धोके ओळखता खा.सदाशिव लोखंडे यांनी यावर पर्याय शोधला आहे.
ते आता नव्या राजकीय खेळीमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे अहमदनगरमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.
मतदारांची ओढवलेली नाराजी
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. जागा वाटपात शिर्डी शिवसेनेच्या वाट्याला आली खरी पण ऐनवेळेस उमेदवार नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने शिवसेनेला सदाशिव लोखंडेंचे नाव सूचविले व त्यांनाच तिकीट देण्यात आले.
त्यात ते बहुमताने निवडूनही आले. शिवसेनेत दोन गट पडताच ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले होते. परंतु सध्या मतदारांत त्यांच्याविरोधात ओरड आहे. ते शिर्डी मतदार संघात येत नाहीत. सामान्यांना भेटता येत नाही अशा तक्रारी सध्या मतदार करत आहेत.
२०१९ च्या निवडणुकांतही हीच ओरड होती व पण ते तेव्हाही निवडूनहीआले होते. परंतु आता त्यांचा मतदार संघात जास्त संपर्क येत नसल्याने मतदार नाराज आहेतच शिवाय आता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरे गटातील शिवसैनिक करत असल्याने तेथेही त्यांची राजकीय इमेज खालावली आहे. त्यामुळे आता त्यांनी ही वाढती नाराजी पाहता नवीन उपाय शोधून काढला आहे.
नवी राजकीय खेळी करणार
सदाशिव लोखंडेंची डाऊन झालेली इमेज पाहता, भाजपकडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी नवा उमेदवार शोधला जाऊ लागला आहे. तसेच यावेळी शिर्डी मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार नसल्याची चर्चा आहे. यावर लोखंडेंनी उपाय शोधायला सुरूवात केली असून नवीन बांधणी ते करत आहेत.
सध्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने व या मतदार संघात भाजपचा उमेदवार कधीच निवडून आलेला नसल्याने या मतदार संघाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या श्रीरामपूर मतदारसंघाचे तिकीट सदाशिव लोखंडे तीन मुलांपैकी एकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत अशी अंतर्गत चर्चा रंगली आहे.
गुरुवारी झालेला खासगी कार्यक्रम ही याचीच तयारी असल्याचे बोलले जात आहे. सध्या येथे लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार असून या मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. परंतु अलीकडलील काळात काँग्रेस कार्यकर्त्यांत दोन गट दिसून येत
असल्याने व लहू कानडेंचे युवा नेते करण ससाणे यांच्याशी पटत नसल्याचे बोलले जात असल्याने यांत मतभेद दिसत आहेत. याचा फायदा लोखंडे घेण्याच्या विचारात असून आगामी विधानसभेला येथूनच तयारी करण्यासाठी त्यांनी विविध राजकीय खेळ्या सुरू केल्या असल्याची चर्चा आहे.