Ahmednagar News : आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने तालुका कृषी विभागाने तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे मोफत वाटप केले होते. पाऊस कमी असल्याने व रब्बीची पिके घेता येणार नसल्याने तालुक्यात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला.
ज्वारीचे पिक इतके चांगले आले आहे की, त्यामधून सुमारे ४० ते ५० मेट्रिक टन (पंचवीस कोटी रुपये) ज्वारीचे उत्पन्न होणार असल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठामार्फत आलेल्या ‘ फुले सुचित्रा’ या वाणाच्या बियाणाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. ज्वारी पिकाची पाहणी करण्यासाठी शिंदे मोहोज देवढे येथे इंदुबाई बाबासाहेब सावंत यांच्या शेतामध्ये गेले होते.
या वेळी मंडळ कृषी अधिकारी वैभव थोरे, नारायण खेडकर, शुभम शिरसाट, इंदुबाई सावंत उपस्थित होत्या. शेतभेटीनंतर बोलताना शिंदे म्हणाले, ज्वारीच्या पेरणीनंतर २१ दिवसांनी ज्वारीचा मुकुटमणी फुटताना पावसाची गरज असते. यावर्षी २७, २८, २९ व ३० नोहेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ज्वारीची पिके जोमात आहेत.
तिसगाव, जवखेडे, मांडवा, सोमठाणे, कासारवाडी, माणिक दौंडी, चितळवाडी, पागोरी पिंपपळगाव, सोमठाणे नलवडे, निपाणी जळगाव, कोरडगाव, खरवंडी, भालगाव, मुंगुसवाडे, करंजी, शिराळ, चिचोंडी, मिरी, शंकरवाडी, रुपेवाडी, अशा सर्वच भागात ज्वारीचे पीक चांगले आहे.
७ हजार ५०० शेतकऱ्यांना पंधरा मेट्रीक टन बियाणे कृषी विभागाने दिले होते. यामधून ४० ते ५० हजार मेट्रीक टन ज्वारीचे उत्पन्न होईल तर १ लाख टन कडवा मिळणार आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शेतकऱ्यांनी कपाशीचे पिक घेण्यापेक्षा उडीद, तुर, ज्वारी, अशा पिकाकडे वळाले पाहिजे. नगदी व चांगले उत्पन्न देणाऱ्या या पिकांचे क्षेत्र तालुक्यात वाढले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती मोहीम हाती घेणार असल्याचे शिंदे म्हणाले.