ग्रामीण भागात रॉकेल मिळेना ! शिधापत्रिकेवरील रॉकेल गायब

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : एकेकाळी दैनंदिन व्यवहारात अनन्य साधारण महत्व असलेले रॉकेल आता ग्रामीण भागात मिळणे दुरापास्त झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही रॉकेलचा वापर करावा लागत असल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ग्रामीण ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळाल्याने त्यांच्या शिधापत्रिकेवरील रॉकेल गायब झाले आहे तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांनाही शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत घरोघरी गॅस सुविधा पुरवली असल्याने त्यांच्याही शिधापत्रिकेवरील रॉकेलची नोंद बंद झाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात रॉकेल मिळणे मुश्किल झाले आहे.

शासनाने ग्रामीण भागातील धुरयुक्त चुली बंद करण्यासाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. गॅस कनेक्शन असलेल्या व्यक्तीला रॉकेल देण्यात येऊ नये, या शासनाच्या नियमानुसार त्यांचा रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला आहे.

परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांना होणारा पुरवठाही शासनाने बंद केला आहे. या भागात घरोघरी वीज व गॅस कनेक्शन उपलब्ध असले, तरी आजही अनेक कामांसाठी रॉकेलची आवश्यकता भासत आहे.

रॉकेलवर चालणारे पाण्याचे इंजिन, दिवसेंदिवस वाढणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे मोल – मजुरांसह सामान्य कुटुंबांनाही ते घेणे परवडत नसल्याने गावा गावांमध्ये पुन्हा एकदा परंपरागत चुली पेटू लागल्या आहेत.

परिणामी चुली पेटवण्यासाठी सुद्धा गृहिणींना रॉकेल मिळत नसल्याने पर्यायी प्लास्टीक पिशवी किंवा कागदाचा उपयोग करून चूल पेटवावी लागत आहे. रॉकेल पुरवठा बंद झाला असला तरी त्याची मागणी कायम आहे.

परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांवर रॉकेलसाठी भटकंतीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने रॉकेलचा पुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा ग्रामीण नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe