अहमदनगर : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या दोघांनी बेरोजगारास साडेपंधरा लाखांस गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात ओळख असल्याचे भासवून हा गंडा घालण्यात आला आहे.
दोन-अडीच वर्षे उलटूनही नोकरी न लागल्याने त्या तरुणाच्या पालकांनी पैशांची मागणी केली असता, त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने याप्रकरणाचे बिंग फुटले अन् हे प्रकरण पोलिसांत गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर त्र्यंबक खालकर व राहुल पवार
अशी ठकबाजांची नावे आहेत. याबाबत ग्यानदेव झामरू चौरे यांनी तक्रार दाखल केली आहे. चौरे यांच्या मुलाची २०२१ मध्ये संशयितांशी भेट झाली होती. यावेळी त्यांनी मंत्रालयात ओळख असल्याचे भासवून मुलास सरकारी नोकरी लावून देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे चौरे बापलेकांचा विश्वास बसला.
यावेळी नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांची मागणी केली. ठरल्यानुसार जेलरोड येथील एका भागात तब्बल साडे पंधरा लाखांची रोकडही स्वीकारली. मात्र, दोन ते अडीच वर्षे उलटूनही नोकरी लागली नाही.
त्यामुळे चौरे यांनी संबंधितांकडे पैशांसाठी तगादा लावला असता चौरे यांना शिवीगाळ व दमबाजी केली. त्यामुळे चौरे यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रसंग सांगत या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हादाखल केला असून, सहायक निरीक्षक चौधरी याप्रकरणी तपास करीत आहेत.