Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यानंतर विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडतील. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून आतापासूनच राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
राजकीय पक्ष देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. दरम्यान अहमदनगरमधून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरे तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर काँग्रेसमध्ये आता शीतयुद्ध सुरू होणार अशी शक्यता आहे. कारण की जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेतुन नागवडे कुटुंबाला इंडिया आघाडीकडून तिकीट मिळाले पाहिजे अशी इच्छा नागवडे दांपत्याने बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे जर श्रीगोंदा विधानसभेसाठी तिकीट मिळाले नाही तर काँग्रेसची वाट सोडू, वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढवू नाहीतर इतर पर्यायांचा विचार करू अशी भूमिका नागवडे दांपत्याने घेतली आहे.
दरम्यान नागवडे दाम्पत्यांनी अशी भूमिका घेतली असल्याने आता इंडिया आघाडी समोर विधानसभेच्या या जागेसाठी मोठा पेंच निर्माण होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये या जागेवरून राष्ट्रवादीचे राहुल जगताप निवडून आले होते. विशेष म्हणजे त्यांनी मोदींची सुनामी असतानाही भाजपात गेलेल्या बबनराव पाचपुते यांचा पराभव केलेला होता. दरम्यान या मोदी सुनामीतून जगताप यांना विजयी करण्यात काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजी नागवडे यांचा वाटा होता.
शरद पवार यांच्याशी चर्चा करून काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजी नागवडे यांनी या जागेसाठी जगताप यांना सहकार्य केले आणि त्यांना निवडून आणले. 2019 मध्ये मात्र या जागेवरून पाचपुते विजयी झालेत. भाजपात गेल्याने पाचपुते यांना दमदार विजय मिळवता आला. दरम्यान 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याला या जागेवरून विधानसभेत पाठवले असल्याने शरद पवार यांनी साखर महासंघाचे अध्यक्ष पद दिवंगत नेते शिवाजी नागवडे यांच्याकडे दिले.
मात्र यामुळे नागवडे कुटुंब तालुक्याच्या राजकारणात कुठेतरी पिछाडीवर गेलेत. आता मात्र नागवडे कुटुंबाने तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी या जागेवरून विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे आता इंडिया आघाडीत या जागेच्या उमेदवारीवरून मोठा संघर्ष होणार असे चित्र तयार होत आहे.
विशेष म्हणजे नागवडे या जागेवरून निवडणूक लढवणार असे दिसत असल्याने वर्तमान आमदार पाचपुते यांच्यापुढे देखील एक मोठे आव्हान उभे राहणार आहे. खरे तर पाचपुते तब्येतीच्या कारणावरून आगामी विधानसभा लढवणार नसल्याचे सांगितले जात असून या जागेवरून आपल्या पुत्राला किंवा पत्नीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. एवढेच नाही तर इंडिया आघाडीकडून जगताप यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे.
पण आता काँग्रेसकडून जर श्रीगोंदा विधानसभेसाठी तिकीट मिळाले नाही तर अपक्ष निवडणूक लढवू किंवा इतर पर्यायांचा विचार करू असे नागवडे दांपत्याने स्पष्ट केले आहे. यामुळे जगताप यांना देखील नागवडे दाम्पत्याच्या या भूमिकेचा फटका बसू शकतो. एकंदरीत श्रीगोंदा विधानसभेची आगामी निवडणूक ही खूपच रंगतदार होणार आहे.
अशातच आता नागवडे दांपत्याने 19 जानेवारीला माजी आमदार दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण पाठवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागवडे दाम्पत्य स्वतः जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देऊन आले आहेत.
सध्या या भेटीचे फोटोज देखील प्रसार माध्यमांमध्ये वेगाने व्हायरल होत आहेत. यामुळे सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात नागवडेंच्या समोर असलेल्या पर्यायातला एक पर्याय राष्ट्रवादी अजित पवार गट असू शकतो, अशा चर्चांना मोठे उधाण आले आहे. यामुळे आता श्रीगोंदा विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार होणार असून या जागेवरून इंडिया आघाडीकडून कोणाला तिकीट मिळते आणि महायुतीच्या माध्यमातून कोणता उमेदवार उभा केला जातो हे पाहणे विशेष महत्त्वाचे राहणार आहे.