अवकाळीने शेतकऱ्यांची काळजी वाढली पिकांवर रोगराई वाढून उत्पन्नात घट येण्याची शक्यता

Published on -

Ahmednagar News : वातावरणाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय सलग दोन वर्षांपासून तोट्यातच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही.

गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना मंगळवारी पुन्हा पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता.

राज्यात दोन दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार पुन्हा मंगळवारी सकाळपासूनच अवकाळी सरी बरसल्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर अनेक ठिकाणी सूर्यदर्शनही झाले नाही. ढगाळ हवामान अन् अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर रोगांचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात २६ ते ३० दरम्यान तसेच ६ जानेवारी रोजी ही जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यात रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून बचावलेल्या कांदा, गहू, तूर, मका फळबागांचे आता पुन्हा झालेल्या पावसाने नुकसान होणार आहे.

अनेक भागात लाल कांदा काढणीच्या टप्प्यात आलेला असून तेथे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच गव्हाचे पीकही चांगले आहे. मात्र, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे.

गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो तर हरभरा पिकावर घाटी अळी, कांदा लसूण पिकांवर करपा, डाऊनी, मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. काढणीला आलेला कांदा गाभ्यात पाणी गेल्याने सडणार आहे. एकंदरीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोरील संकटात भरच पडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News