Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील चोरी, दरोडे आदी घटनांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर आले आहे. आता एक मोठी कारवाई पोलिसांनी केली असून सशस्त्र दरोडा टाकायला निघालेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.
या टोळीवर विविध पोलिस ठाण्यात १४ चोरी व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक म्हणजे यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.
साईनाथ तुकाराम पवार (वय २२), आकाश गोरख बर्डे (वय २८), विशाल पोपट बर्डे (वय १८), नवनाथ तुकाराम पवार (वय २७), अमोल दुर्योधन माळी (वय १८) व कुरणवाडी (ता.राहुरी) येथील अल्पवयीन आरोपी आदी आरोपींचे नावे आहेत.
अधिक माहिती अशी : ८ जानेवारी रोजी रात्री नगर ते सोलापूर रोडवरील वाळुंज शिवार, पारगांव फाटा येथे ५ ते ६ जण दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरुन थांबलेले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना देताच पथकाने छापा टाकला.
यावेळी अंधारात झुडपाच्यामागे काही जण दबा धरुन बसलेले होते. पथकाची चाहूल लागताच ते पळाले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. आरोपींकडून २ तलवारी, १ टामी, ४ मोबाईल, नायलॉन दोरी, लाकडी दांडके व मिरचीपूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यांच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर असून जिल्ह्यात अनेक चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.