Ahmednagar News : जीवघेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. यात मुले, पशु-पक्षी, वाहनधारक, पादचारी आदींच्या जीवावरही बेतते, त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
मात्र नगरमधल्या दोघांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. सुमित मनीष लोढा व शुभम किशोर फुलसौंदर (दोघेही रा.नगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून मिळून २६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम त्याच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांजाची विक्री करत असून, तो आता गेल्यास सापडेल, ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले.
या कारवाईत आरोपी सुमित लोढा याच्याकडून ७ हजार ५००रूपये किमतीचे १५ विविध रंगाचे नायलॉन बंडल, ७ हजार रूपये किमतीचे ७ नायलॉन मांजा गुंडाळालेले चक्री व ३ हजार रूपये किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, शुभम फुलसौंदर याच्याकडून ४ हजार ६००रूपये किमतीचे मांजा असलेले सात बंडल व मांजा गुंडाळण्यासाठी असलेली ४ हजार किमतीची इलेक्ट्रिक मोटार असा एकूण ८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.