Ahmednagar News : शासकीय,प्रशासकीय अनास्थेचा फटका जेव्हा पालकमंत्री विखेंनाच बसतो तेव्हा.. चढाव्या लागल्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : बऱ्याचवेळा शासकीय कार्यालयांमधील दुरावस्था समोर येत असते. ही दुरावस्था दूर करण्यासाठी शासन तर कधी प्रशासकीय अनास्था अडसर ठरते. परंतु आता या अनास्थेचा फटका महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच अहमदनगरमध्ये बसला. त्याचे झाले असे की, मंत्री विखे हे, काल रविवारी (दि. १४) संगमनेरात होते.

तेथे त्यांची विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांसमवेत यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील प्रांताधिकारी कार्यालयात बैठक होती. पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रांत कार्यालयात जाण्यासाठी पालकमंत्री विखे हे प्रशासकीय भवनातील लिफ्टमध्ये गेले. मात्र, लिफ्ट पहिल्या मजल्यावर पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्यांना पायऱ्या चढून बैठकीला जावे लागले.

या इमारतीतील लिफ्ट कधी सुरू तर कधी बंद अशा अवस्थेत असते. याचा फटका इतरांना तर नेहमीच बसतो पण काल स्वतः विखे यांनाच हा फटका बसला.

अधिकाऱ्यांची धावपळ

पालकमंत्री येणार असल्याने तशी पूर्वतयारी झाली होती. ही बंद असणारी लिफ्ट सुरू देखील केली होती. विखे जेव्हा ते पहिल्या मजल्यावरील प्रांताधिकारी कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले व इतर अधिकारी जिने चढून पहिल्या मजल्यावर विखे यांची वाटत पाहत उभे राहिले. पण बराच काळ केला तरी लिफ्ट वर येईना. मग अधिकारी पुन्हा खाली गेले. प्रयत्न करूनही लिफ्ट वर जाईना. अखेर पालकमंत्री विखे यांना पायऱ्या चढून जावे लागले.

इतरांचे हाल लक्षात येतील का ?

या कार्यालयातील लिफ्ट नेहमीच बंद असल्याने येथे येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्तींना जिने चढून कार्यालयात जावे लागते. त्यामुळे त्यांचे हाल खूप होत आहेत. लिफ्ट बंद असल्याने वयोवृदध, दिव्यांग नागरिकांना उचलून शासकीय कार्यालयांमध्ये न्यावे लागत असल्याचे चित्र आहे. आता ही लिफ्ट नादुरस्त असल्याचा अनुभव पालकमंत्री विखे पाटील यांनाही आला आहे. त्यामुळे त्यांनाही इतरांचे हाल लक्षात येतील व ते तातडीने हे दुरुस्त करण्याच्या सूचना देतील अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe