अहमदनगर मध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना घरचा आहेर! स्वपक्षीय पिता-पुत्रांच्या कार्यपद्धतीवर नाराज, निवडणुक जड जाणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

एकूणच काय की आता लवकरच निवडणुकांचे सत्र सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या माध्यमातून देखील मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

विशेष म्हणजे महायुतीने आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या घटक पक्षांचा मेळावा नुकताच अहमदनगर मध्ये पार पडला आहे. या मेळाव्यापूर्वी पूर्वतयारीसाठी महायुतीतील भाजपामधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने महत्वाची बैठक घेतली गेली.

ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून घेतलेली असली तरी देखील या बैठकीत विखे पाटलांविरोधात घटक पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पूर्वीच महायुतीत सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

महायुतीत उभी फूट पडण्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात ताकतवर पक्ष होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजितदादा गट महायुतीत आला. मात्र उभी फूट पडल्यानंतरही अहमदनगर मध्ये अजितदादा गटांकडेच सर्वाधिक आमदारांचे पाठबळ आहे.

ही वास्तविकता असली तरी देखील अहमदनगर जिल्ह्याचे महायुतीतील शक्ती केंद्र विखे पितापुत्रांच्या जवळचं आहे. मात्र विखे पाटलांना आता स्वपक्षातूनच विरोध सहन करावा लागत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांऐवजी आता स्व पक्षातूनच विखे पाटलांना टारगेट केले जात आहे.

यामुळे आगामी निवडणुकांपूर्वीच विखे पाटलांना स्व पक्षातील नाराजी जड जाणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या अहमदनगर भाजपामध्ये एकीकडे विखे पिता पुत्र आणि दुसरीकडे विरोधकांसहित घटक पक्ष आणि स्व पक्षातील नेते असे चित्र तयार होत आहे.

हा महायुतीचा मेळावा असला तरी देखील याचे आयोजक महायुती किंवा भाजप नसून महसूल मंत्री विखेचं आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. खरे तर महसूल मंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिणेमधून पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

यासाठी त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात साखर आणि चणाडाळ वाटपाचा कौतुकास्पद कार्यक्रम हाती घेतला आहे. या साखर वाटपाच्या कार्यक्रमातून त्यांनी मत पेरणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखेंनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यासारखेच आहे.

मात्र नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात विखे पिता-पुत्रांना टार्गेट करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी महसूल मंत्र्यांना टोला लगावला आहे. कर्डीले यांनी लोकसभा झाल्यानंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका नाहीतर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घ्या म्हणजे आमच्या विधानसभेचे काम सोपे होईल असा टोला लगावला आहे.

यावर बोलताना महसूलमंत्र्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी विधानसभा आणि लोकसभा एकत्रित लढवण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा यामुळे आमचे काम सोपे होईल असं काउंटर विधान केले आहे. याशिवाय भाजपा विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील विखे यांना गर्भित इशारा दिला आहे.

आमदार शिंदे यांनी पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता धक्कातंत्र अवलंबले असल्याचे नमूद केले असून राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये याची प्रचिती आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेथे ज्या प्रमाणे मागील रांगेत बसणारे आमदार मुख्यमंत्री झाले आहेत तसेच धक्कातंत्र आगामी निवडणुकांच्या उमेदवारीसाठी लागू शकते असा इशारा त्यांनी विखे पिता पुत्रांना दिला आहे.

विशेष म्हणजे या मेळाव्याला भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी दुर्लक्ष करत मेळाव्याला उपस्थिती लावणे महत्त्वाचे समजलेले नाही. एकंदरीत महायुतीच्या या मेळाव्यात घटक पक्षांऐवजी विखे पिता-पुत्रांना स्वपक्षातूनच मोठा आहेर मिळाला आहे.

यामुळे आगामी निवडणुका विखे पिता-पुत्रांसाठी सोप्या राहणार नाहीत हे स्पष्ट होत आहे. स्व-पक्षातच त्यांच्या विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ही नाराजी आगामी निवडणुका प्रभावित करणार का की विखे पिता पुत्र दिल्ली दरबारी असणारे आपले वजन वापरून पुन्हा एकदा निवडणुकीच्या उमेदवारीत आपली पकड मजबूत ठेवणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe