ST Employees News : एसटी महामंडळाकडून चालक-वाहकांसाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. मात्र सर्रास या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक चालक-वाहक हे कामगिरीदरम्यान त्यांच्या नावाची पाटी
तसेच बॅज बिल्ला लावत नसल्याने कामगिरीवर असणाऱ्या संबंधित चालक-वाहक यांच्या नावाची प्रवाशांना ओळख पटत नसल्याने प्रवाशांना त्यांच्या सुचना एसटी महामंडळापर्यंत पोहचवण्यास विलंब होतो.
यामुळे एसटीच्या चालक-वाहकांनो, गणवेशावर बॅज बिल्ला, नावाची पाटी लावा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार सर्व चालक-वाहक यांनी कामगिरीवर असताना त्यांना नियोजित केलेल्या गणवेशासह नावाची पाटी व बेंज बिल्ला लावणे अनिवार्य आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमधील चालक-वाहक यांच्या वर्तनाविषयी एसटी महामंडळास काही सूचनावजा तक्रारी द्यावयाच्या असल्यास त्याचा आधार घेता येतो.
मात्र अनेक चालक-वाहक या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक यांना यासंबंधी सूचना केल्या आहेत.
सर्व आगारांचे चालक, वाहक हे कामगिरीवर योग्य गणवेशात राहतील याबाबत विशेष काळजी घ्यावी. चालक-वाहकांची कामगिरी सुरू होण्यापूर्वी याबाबतची खातरजमा कामगिरीवरील वाहतूक नियंत्रक, वाहतूक पर्यवेक्षक यांनी करावी, याची अंमलबजावणी ३१ जानेवारीपूर्वी होणे अपेक्षित आहे.
यानंतर कामगिरीवरील कुठलेही चालक- वाहक गणवेशात नावाची पाटी व बॅज बिल्लाविना आढळल्यास चालक-वाहकांसह संबंधित आगाराचे आगार व्यवस्थापक व वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महामंडळाकडून देण्यात आला आहे.