Ahmednagar News : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्राच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ (चिकन, मटन, मासे) विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय तालुक्यातील बेलापूरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
बेलापूर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरी महाराज तथा आचार्य किशोर व्यास यांची प्रभू श्रीराम मंदिराच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच बेलापूरात आले असता, मुस्लिम समाजाने त्यांना मस्जिदमध्ये नेवून राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती.
तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदू बांधवच्या उपवासाचे महत्व लक्षात घेऊन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापूरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता.
त्याच धर्तीवर बेलापूर ग्रामपंचायतीच्या वातीने बेलापूर बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालय येथे चिकन, मटन, मासे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने या दिवशी चिकन, मटण, मासे आदी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी,
अशी विनंती उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना केली. या विनंतीला मान देत सर्व व्यवसायिकांनी २२ जानेवारी रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार, मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद,
श्रीलाल गुडे, जुबेर कुरेशी, अबीद पठाण, रामू गुडे, रज्जाक पटेल, मुझफर कुरेशी, कय्युम कुरेशी, उबेद कुरेशी, गोलू आतार आदी उपस्थित होते.