Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत आरोप करण्यात आला होता. यात हिंद सेवा मंडळाचे काही संचालक दलाली करत आहेत असाही आरोप झाला होता.
हे सगळे आरोप चुकीचे असून या जागेवरील ताबा सोडण्यासाठी संस्थेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यापोटी जागा मालक संस्थेला २५ कोटी रुपयांपर्यंत मदत देणार आहेत. प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत सदस्य निर्णय घेतील.

संस्थेच्या हिताचा प्रस्ताव असल्याने तो आम्ही मांडला आहे. मात्र, केवळ माजी आमदार अरुण जगताप यांचे नाव यात आल्याने राजकीय दृष्टीकोनातून आरोप होत असल्याचा खुलासा हिंद सेवा मंडळाने आता केला आहे.
किरण काळे कोण हे आम्हाला माहिती नाही. त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत, अशी विनंती आहे. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, विश्वस्त अनंत फडणीस यांनी जागेच्या आरोपांबाबत भूमिका पत्रकार परिषदेत माडली.
‘ती’ जागा कुणाची? सध्या मालक कोण?
सारडा महाविद्यालयाजवळ संस्थेकडे सुमारे अडीच एकर जागा भाड्याने आहे. ती जागा तकिया ट्रस्टकडू भाड्याने घेतली गेली होती. त्यांनी १९९५-९६ मध्येच ती लुनिया – मुनोत कंपनीला विकलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जागेचा कायदेशीर ताबा आजही संस्थेकडेच आहे. लुनिया मुनोत यांनी जागा कुणाला विकायची, हा त्यांचा प्रश्न आहे असे पत्रकार परिषदेत मंडळांनी सांगितले.
२५ कोटी रुपयांची मदत
विश्वस्त अनंत फडणीस यांनी सांगितले की, आमच्याकडे जगताप व हर्षल भंडारी यांनी रितसर प्रस्ताव दिला आहे. जागेचा ताबा सोडण्यासाठी त्यांनी संस्थेला २५ कोटी रुपयांची मदत बांधकाम स्वरूपात देऊ केली आहे. यातून नगर शहर, अकोले, श्रीरामपूर,
मिरजगाव येथील आमच्या मालकीच्या जागांवर बांधकामे करता येतील असे म्हटले आहे. सध्याची जागा केवळ ४० वर्षांसाठीच आमच्याकडे आहे. तेथे प्रकल्प उभारणीसाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, ४० वर्षांसाठी कोणीही गुंतवणूक करण्यासाठी सहकार्य करत नव्हते.
त्यामुळे आमच्याकडे आलेला प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला. त्याला सहा जणांनी विरोध केला, तर २२ जणांनी मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. संस्थेचे १०५० सदस्य व ६०० शिक्षक सदस्य आहेत. ते जो निर्णय घेतील, तो सर्वमान्य असेल, असे ते म्हणाले.