Ahmednagar News : धन्य ती माऊली !! श्रीरामांकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करणार, राहीबाईंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रण

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशभर उत्सव केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून खास मान्यवर आमंत्रित केले आहेत. अहमदनगर मधील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

प्रभू श्रीरामांकडे शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येऊ देत व देशवासीयांचे ताट विषमुक्त होऊ दे ! अशी प्रार्थना समस्त शेतकरी परिवारांसाठी त्या करणार आहेत.

बालपणापासून प्रभू श्रीरामाची त्या पूजा करत आल्या आहेत. त्यांनी यावेळी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. होळी, दिवाळी, दसरा या सर्वच महत्त्वाच्या सणांना प्रभू रामाची प्रार्थना व परंपरागत गाणी आम्ही कायम गात असायचो,

असेही त्यांनी सांगितले. रामजन्मभूमीत होऊ घातलेल्या या अद्वितीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान राहिबाईंच्या रूपाने तालुक्याला मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत गरिबीत व प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगलेल्या राहिबाई यांनी आपल्या शेतात व बियाण्यांमध्येच राम पाहिला.

गावरान बियाणे रूपी राम प्रत्येकाच्या शेतात पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्ना करील, असेही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपण करत असलेले कार्य समस्त शेतकरी परिवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनीच आपणास शक्ती व विचार द्यावेत, अशीही इच्छा त्याची व्यक्त केली.

अर्धा दिवस सुट्टी

केंद्र सरकारने येत्या 22 जानेवारीला देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली असून आता देशभरातील सरकारी कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांना सकाळपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत सुट्टी राहील. लोकांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे

यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त 22 जानेवारीला केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील.