कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढणार ? वाचा ए टू झेड माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Kunbi Caste Certificate

 

Kunbi Caste Certificate : सध्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा खूपच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. दरम्यान याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जर एखाद्या व्यक्तीकडे कुणबी असल्याची नोंद असेल तर त्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते, असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी दोनदा उपोषण केले.

मात्र दोन्ही वेळा शासनाने मध्यस्थी करून, आश्वासन देऊन हे उपोषण मागे घेण्यास भाग पाडले आहे. मात्र मराठ्यांना सरसकट आरक्षण बाबत अजूनही सकारात्मक निर्णय झालेला नाही. शासन यावर अजून विचारच करत आहे. अशा परिस्थितीत मनोज पाटील यांनी येत्या 22 जानेवारीपासून चलो मुंबईचा नारा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार असून मुंबईला पोहोचल्यानंतर तिथे पाटील उपोषणाला बसणार आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या मोर्चाकडे विशेष लक्ष राहणार आहे. दरम्यान शासनाने कुणबी नोंदी आढळल्यास नातेवाईकांना देखील कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाऊ शकते असा निर्णय घेतलेला असल्याने आज आपण कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची सविस्तर प्रोसेस पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर कुणबी ही जात ओबीसी प्रवर्गात येते. अशा परिस्थितीत ज्या लोकांकडे कुणबी नोंदी आढळून येतील त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू शकणार आहे.

कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढणार

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस ही इतर जात प्रमाणपत्र जसे काढले जातात तशीच आहे. हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे येथे जोडावी लागतात. कुणबी जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर कुणबीची नोंद असलेले कागदपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे. परंतु कुणबी नोंद असलेले कागदपत्र हे 1967 पूर्वीचे असणे आवश्यक आहे.

यानंतर जर कुणबी नोंदचे कागदपत्र असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही आणि तुम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकणार नाही. जर तुमच्याकडे कुणबी नोंद असेल तर तुम्ही तहसील कार्यालयात जां, आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करां आणि कुणबी कास्ट सर्टिफिकेट साठी अर्ज करा. एकदा की अर्ज सादर झाला की प्रांताधिकारी या अर्जाची पडताळणी करतील, जर सर्व बरोबर असेल तर तुम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळून जाईल.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

1967 पूर्वी कुणबी नोंद असलेला कागदोपत्री पुरावा, वंशावळ ( वंशावळ साध्या कागदावर देखील बनवली जाते), अर्जदाराचा रहिवासी दाखला, शाळेचा दाखला (TC) किंवा बोनाफाईड, अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्म-मृत्यू नोंदीचा पुरावा (1967 पूर्वीचा), कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र (बंधनकारक नाही) इत्यादी कागदपत्रांसोबत यासाठी अर्ज केला जाऊ शकतो.