Ahmednagar News : सध्याच्या घडीला सरपंच हा जनतेमधून निवडला जातो. त्यामुळे बऱ्याचदा सरपंच एका गटाचा व बाकी सदस्य वेगळ्या गटाचे असे घडताना दिसते. बऱ्याचवेळा सरपंचाला राजकीय नेत्यांच्या गटा-तटाच्या राजकारणाला तोंड द्यावे लागते. सध्या अशाच एका प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे व या ग्रामपंचायतमधील एका प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणल्या आहेत. या सरपंचाने विखे-मुरकुटे गटाने केलेल्या कुरघोडीवर मात करत एक प्रकारे या मातब्बरांना एक चपराकच दिली आहे.
विखे-मुरकुटे गटाच्या सदस्यांनी मुठेगावचे सरपंच सागर मुठे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी 12 जानेवारीला तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता.
याआधारे गुरूवारी (ता. 18 ) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सरपंच मुठे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत या विशेष सभेला स्थगिती आणल्याने सरपंच मुठे यांची खेळी मातब्बरांना भारी पडल्याची चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये आहे.
मुठेवाडगाव ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य संख्या आहे. यात काॅंग्रेस आमदार लहु कानडे गटाचे सरपंच सागर मुठे यांच्याकडे पाच तर, विखे-मुरकुटे गटाकडे चार, असे संख्याबळ निवडून आलेले होते. यामध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण या कारणावरून सत्ताधारी गटाचे दोन सदस्य अपात्र झाले असून या दोन्ही जागेच्या
पोटनिवडणुकीत विखे-मुरकुटे गटाचे सदस्य निवडून आले. त्यामुळे त्यांची सदस्य संख्या सहा झाली.
विखे-मुरकुटे गटास आता सरपंच सागर मुठे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी एका सदस्याची गरज होती. त्यानंतर मग उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरूद्ध सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल करण्यात आला व सत्ताधाऱ्यांनी विरोधी गटाच्या सदस्या लंका दिनकर मुठे यांच्याविरूद्ध अतिक्रमण केल्याची तक्रार दिली होती. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी दोन्ही सदस्यांना अपात्र ठरवल्यानंतर दोन्ही गटाने नाशिक अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरूद्ध धाव घेतली होती.
यावेळी मग अतिरिक्त आयुक्तांनी विखे-मुरकुटे गटाच्या सदस्या लंका दिनकर मुठे यांच्या निकालास स्थगिती दिली. परंतु यात सत्ताधारी गटाच्या उपसरपंच विजया भोंडगे यांचा निकाल मात्र कायम ठेवल्याने त्या अपात्र ठरल्या गेल्या. त्यामुळे विखे-मुरकुटे गटाची सदस्य संख्या सहावर गेली व सत्ताधारी गटाकडे सरपंचपद धरून फक्त दोनच जागा राहिल्या.
त्यामुळे अविश्वास ठरावाचा मार्ग मोकळा झाला असे समजून 12 जानेवारीला सहा सदस्यांनी अविश्वासासाठी तक्रारी अर्ज दाखल केला होता. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी गुरूवारी (ता. 18) यासाठी विशेष सभा बोलावली होती. परंतु यावेळीही सरपंच मुठे हे शांत बसले नाहीत. त्यांनी लागलीच या निर्णय विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली.
जिल्हाधिकारी यांनी दोन्ही महिला सदस्यांना सारखाच निकाल दिलेला असताना अतिरिक्त आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या निकालामुळे त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले. न्यायालयाने उपसरपंच विजया भोंडगे यांच्या निकालास स्थगिती दिली. यामुळे तहसीलदारांनी बोलावलेल्या विशेष सभा थांबवली असून ३० जानेवारीला प्रतिवादी पक्षास हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा आहे. सरपंच हा विकेह मुरकुटे यांना ‘भारी’ भरल्याची चर्चा सध्या सुरु आहे.