Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग समाजकंटकांनी रातोरात बदलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान हे समाजकंटक पसार झाले. ही घटना राहुरी तालुक्यात घडली.
वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ दोन्ही गावच्या सीमेवरील धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग बदलण्याचा प्रयत्न झाला आहे. अमीर दादाभाई इनामदार (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मियाँसाहेब बाबा पादुका हे धार्मिक स्थळ या दोन्ही गावाच्या सीमेवर आहे. त्या शेजारील रस्त्यावर एक कमान असून साजीद शेख हे मंगळवारी (ता.१६) रात्री साडेअकरा वाजता राहुरीकडून टाकळीमियाँ रस्त्याने जात असताना या दर्गा आणि कमानीला काही समाजकंटक रंग देत असल्याचे त्यांनी पाहिले. साजीद शेख यांना पाहताच ते समाजकंटक तेथून ताबडतोप पसार झाले.
साजीद शेख यांनी दर्गाचे पुजारी अमीर दादाभाई इनामदार यांना कळवले. ही माहिती गावात पसरताच
बुधवारी (ता. १७) धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केली होती. यातून दोन्ही गावात तणावाची स्थती निर्माण झाली. राहुरी पोलिसांनी या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
तणावाची स्थिती पाहता पोलिसांचा फौजफाटा गावातच तैनात करण्यात आला होता. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र काही समाजकंटकांकडून करण्यात आले असून एका आजच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. पोलिस प्रशासनाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेत कार्यवाही केल्याने वातावरण निवळले होते.