Rahuri News : मुळा धरणातून वांबोरी चारीला सातत्याने प्रामाणिकपणे पाणी सोडण्याचे काम खासदार सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. त्यांनी कधीही पावसाने तलाव भरलेल्या पाण्याचे जलपूजन केले नाही.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील महावितरण व मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना करून वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश दिले.

आणि याच पाण्याचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी केली आहे.
वांबोरी चारीचे विज बिल मोठ्या प्रमाणात थकले त्यामुळे थकीत वीज बिला अभावी या योजनेचे वीज कनेक्शन महावितरण कडून कट करण्यात यायचे व ही योजना बंद पडायची. मग आत्ताचे विद्यमान लोकप्रतिनिधी अडीच तीन वर्ष राज्याचे ऊर्जामंत्री होते.
त्यांनी त्यांच्या अधिकारांमध्ये जर मुळा धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ही योजना सौर उर्जेवर चालवण्यास प्राधान्य दिले असते तर वीज बिलाअभावी ही योजना कधीच बंद झाली नसती. परंतु त्या वेळचे अपयश झाकण्यासाठी खासदार विखे व माजी मंत्री कर्डिले यांनी सूचना केल्यानंतर वांबोरी चारीला पाणी सुरू झाले आणि विरोधकांचा भ्रमनिरास झाला.
वास्तविक महायुती सरकारच्या माध्यमातूनच या योजनेसाठी थकीत वीज बिलामध्ये एक कोटी ९ लाख ७५ हजार रुपयांची सबसिडी शासनाने दिली आहे. त्याचबरोबर ८१ टक्के वीज बिलाची रक्कम शासन भरणार आहे तर १९ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करायची आहे.
परंतु दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरण्याची मानसिकता नाही, असे असताना देखील या महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी व चाऱ्यासाठी वांबोरी चारीच्या माध्यमातून पाणी देण्याचे काम खासदार विखे पाटील व माजी मंत्री कर्डिले यांनी केले आहे.
स्वयंघोषित वांबोरी चारीच्या अध्यक्षांची विखे कर्डिलेवर बोलण्याएवढी उंची आहे का, वांबोरी चारीच्या कामाची ठेकेदारी करून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करणाऱ्यांनी आरोप करणे निव्वळ हास्यस्पद असून. तुम्ही दोन वर्षे भरपूर पाणी दिले म्हणता मग यावर्षी कोणत्या बिळात तुमचं पाणी मुरतंय याचाही खुलासा करावा.
तुमचं योगदान नसताना तुम्हाला बटन दाबायची हाऊस त्यामुळे बिनबूडाचे आरोप करू नयेत, ज्यांचं या योजनेसाठी काहीच योगदान नाही अशा लोकांनी वांबोरी चारीच्या पाण्याचे राजकारण करून विखे कर्डीलेंवर बोलण योग्य नाही, अशा शब्दात एकनाथ आटकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.