नगर तालुका खरेदी – विक्री संघ निवडणूक – दुरंगी लढतीची शक्यता; ६० उमेदवारी अर्ज दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील राजकियदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या १७ जागांसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील मातब्बरांनी अर्ज दाखल केले असुन निवडणुक बिनविरोध झाली नाही तर दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

१८ फेब्रुवारी रोजी खरेदी विक्री संघाच्या १७ संचालक पदाच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक भाजप विरुद्ध महाआघाडी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस होता. यात १७ जागांसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ५ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाची संघावर एकहाती सत्ता आहे. गेल्या २० वर्षांपासून कर्डिले गटाचेच संघावर निर्विवाद वर्चस्व आहे. आताच्या राजकिय लढाईत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकिय सामना होण्याची शक्यता आहे.

खरेदी विक्री संघाच्या एकूण १७ पैकी सहकारी संस्था प्रवर्गासाठी १० जागा असुन त्यासाठी २६ अर्ज दाखल झाले तर वैयक्तिक प्रवर्गातून ७ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यापैकी वैयक्तिक प्रवर्गात २ पुरुष यासाठी १२ अर्ज, २ महिलांच्या जागासाठी ७ अर्ज, १ अनुसूचित जाती जमातीच्या जागेसाठी ४ अर्ज, तर १ इतर मागासवर्गीय जागेसाठी ७ व १ विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत.

संघाचे एकूण १ हजार ९८२ मतदार आहेत. त्यात सहकारी संस्थेसाठी १०७ व वैयक्तिक प्रवर्गासाठी १८७५ इतके मतदार आहेत. मागील निवडणुकीत वैयक्तिक प्रवर्गातून २५५४ इतके मतदार होते.

यावेळी मात्र त्यात सुमारे १ हजार मतदारांची घट झाली आहे. घट झालेल्या मतांची संख्या कुणासाठी फायदेशीर व कोणासाठी तोट्याची ठरणार हे निवडणुकीनंतर समजणार आहे.दरम्यान ५ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याच दिवशी निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe