महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. वातावरणात गारवा वाढत आहे. थंडीचे प्रमाण वाढत आहे. आता ही थंडी आगामी काही दिवसात चांगलीच वाढेल असा हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १० ते १२ अंश असेल.
तर विदर्भात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या ९ जिल्ह्यांत २३ जानेवारीपर्यंत किमान तापमान १० ते १२ तर कमाल २६ अंश सेल्सियसवर असेल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात महाराष्ट्र आणखी गारठणार आहे.

‘या’ भागात असेल दाट धुके
काही भागात धुके पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. उत्तर, पूर्व व मध्य भारतातील बहुतांश भागात २ दिवसांत किमान तापमान ३ ते ८ अंशापर्यंत येणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, बिहार, राजस्थान, आसाम, मेघालय या राज्यात दाट धुके पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.