Ahmednagar News : अपघातात जखमी युवकाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अजिंक्य आदीनाथ वाणी या तरुणाचा उपचारादरम्यान काल रविवारी सकाळी मृत्यू झाला.

राहुरी तालुक्यातील कणगर, चिंचविहिरे, ताहाराबाद, राहुरी कारखाना, देवळाली प्रवरा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याने सातत्याने अपघात घडत असतात. गेल्या शनिवारी सायंकाळी चिंचविहिरे रोडवर श्रीराम मंदिरानजीक मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या धडकेत अजिंक्य आदीनाथ वाणी (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल पहाटे त्याचा मृत्यू झाला. अजिंक्य यांच्यावर काल शोकाकूल वातावरणात गणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजिंक्य हा वाणी सेंट्रल स्कुलचे संचालक आदीनाथ वाणी यांचा मुलगा, तर प्रा. दत्तात्रय वाणी यांच्या पुतण्या होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन अवैध उत्खनन करणाऱ्या तस्करांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

सुमारे १० दिवसांपूर्वी चिंचविहिरे येथील एका महिलेला अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने धडक दिली होती. यात ही महिला गंभीर जखमी झाली होती. पुन्हा अपघात घडल्याने ग्रामस्थांतून अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिजप्रश्नी तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कणगर, चिंचविहिरे, गणेगाव परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe