Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीचे व त्यासाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाचे लोन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांची पदयात्रा मुंबईकडे रवाना झाली आहे. यामध्ये लाखो लोक सहभागी आहेत. यामध्ये वयोवृद्धही समाविष्ठ आहेत.
मोर्चात सहभागी एक ६५ वर्षीय आजोबा पाथर्डीत आल्यानंतर थकून एका झाडाखाली झोपलेले होते. त्यांना याबाबत विचारणा करताच त्यांनी उत्तर दिले की, माझ्या नातवंडासाठी आता कितीही पायपीट करेल, त्यांच्या भविष्यासाठी मला ही पायपीट काहीच वाटणार नाही.

मराठा आरक्षणाचा फायदा भविष्यात माझ्या मुलांना मिळाला नाही, पण माझ्या नातवांना नक्की मिळेल आणि या विश्वासावरच मी चालत असल्याचे आजोबा म्हणाले. शेतकरी अर्जुन हुले असे या ६५ वर्षीय आजोबांचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील टाळेवाडी येथील रहिवासी आहेत.
काय म्हणाले आजोबा?
अर्जुन हुले आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, माझे आयुष्य शेतीत गेले. मुलाचे आयुष्य देखील शेतीत गेले आहे. सकाळी आठ वाजेपासून मी चालत या मोर्चात सहभागी झालो आहे. सरकारने आरक्षण दिले पाहिजे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी चालतच राहणार आहे.
आरक्षण नसल्यामुळे माझ्या मुलाला नोकरी लागली नाही. त्यामुळे त्याला त्याचे आयुष्य शेतीत घालवावे लागले. ही वेळ माझ्या नातवंडांवर येऊ नये, यासाठी मी मोर्चात सहभागी झालो. घरून निघताना मी आरक्षण घेऊनच येईल, असे कुटुंबाला सांगितले आहे. आरक्षणानंतर माझ्या नातवंडांना सरकारी नोकरी लागेल ही मला अपेक्षा असल्याचे हुले यांनी सांगितले.
कायम उसतोडणीच नशिबी
बीड सारख्या दुष्काळी भागात पाऊस नाही. त्यामुळे शेतीत शाश्वत उत्पन्न नाही. त्यामुळे कायम ऊस तोडणीला जावे लागते. आरक्षण असते तर माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागली असती. पण तो आज शेतीत राबत आहे.
माझ्या नातवंडावर ही वेळ येऊ नये म्हणून माझी ही धडपड आहे असे अर्जुन हुले यांनी सांगितले.