Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघाली आहे. काल (२१ जानेवारी) ही पदयात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली. बारबाभळी येथिल मदरसा येथे मुक्काम झाला.
त्यानंतर आज सोमवारी (२२ जानेवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही पदयात्रा सुपे येथे पोहोचेल. तेथे जवळपास पाच लाख मराठा समाजासाठी जेवणाची जय्यत तयारी सुरु आहे. सरदार शाबुसिंग पवार मैदानावर जोरदार तयारी सुरु असून येथे लापशी, पुलाव असा बेत करण्यात आला आहे.

अशी सुरु आहे तयारी
सुपे येथे तब्बल पाच लाख आंदोलकांच्या जेवणाची, बाटलीचंद पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या शुध्द पाण्याचे टँकर मैदानावर असणार आहेत. तब्बल पाच लाख आंदोलकांना लापशी व पुलावचे मिष्ठान्न देण्यात येणार आहे.
त्यासाठी विविध सामाजिक संस्था, तालुक्यातील विविध गावांतील तरूण मंडळांनी पुढाकार घेतला आहे. ठेचा भाकरी, चटणी-चपाती या पदार्थाचा समावेश आहे. विविध समाज बांधवांनी एकत्र येत बूंदी, चिवडा या खाद्य पदार्थाचे नियोजन केले आहे.
कार्यक्रमस्थळी बाटलीबंद पाण्याच्या खोक्यांचा ओघ सुरू आहे अनेक संस्था, मंडळानी रविवारी (२१ जानेवारी) दुपारपासून मैदानावरच स्वयंपाकाची तयारी सुरू होती.
स्वयंसेवकांची फौज
मोर्चातील आंदोलकांच्या स्वागतासाठी, त्यांना जेवण, पाणी पुरवण्यासाठी सुमारे सहा हजार स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. सर्व स्वयंसेवकांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. पारनेर तालुक्याच्या हद्दीवर मोर्चाचे स्वागत करण्यात येणार आहे.
शिरूर (पुणे) तालुक्याच्या हद्दीवर, घोड नदीच्या पुलावर आंदोलकांना निरोप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वैद्यकीय सेवा
उपचारांची गरज असणाऱ्या मोर्चातील आंदोलकांना पारनेर तालुका मेडीकल प्रक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा व औषधे पुरवण्यात येणार आहेत. वैद्यकीय पथकात ५० डॉक्टर, त्यांचे सहायक, तसेच २० रूग्णवाहिका असतील.