Jarange Patil On Ajit Pawar : सध्या महाराष्ट्रात दोन गोष्टींची चर्चा आहे. या दोन्ही चर्चांमध्ये भगव वादळ आहे. एकतर टेंट मधून निघून प्रभू श्रीरामराया आज भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. यामुळे आज दिवसभर प्रभू श्री रामरायांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा पाहायला मिळाली.
दुसरीकडे 20 जानेवारीपासून मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघालेल्या मोर्चाचा आज तिसरा दिवस होता. यादेखील मोर्चाची आज विशेष चर्चा पाहायला मिळाली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा राजधानी मुंबईपर्यंत जाणार आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर जरांगे पाटील तेथील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. या मोर्चाचा आज तिसरा दिवस होता आणि हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहे.
विशेष म्हणजे या मोर्चाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारचे एक शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत, आता कोणीच आंदोलन हलक्यात घेऊ नये असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी जनता दैवत आहे त्यांनी साथ दिली म्हणजे आपण जनतेला साथ दिली पाहिजें.
ते सोडून मस्ती आलीय, त्यांच्याकडून चर्चेचे दारं बंद म्हणाले आहेत. दरम्यान त्यांनी मुंबईत आल्यावर चर्चेचे दार कसे बंद होत हे पहातोच असा गर्भित इशारा देखील दिला आहे. शिवाय आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.
आझाद मैदानात उपोषण करण्याची आमची मागणी कायद्याला धरून असून परवानगी नाही दिली तर सरकारची नाचक्की होणार असे देखील यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मुंबईकडे येताना कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री महोदय यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच त्यांना खोचक टोला देखील लगावला आहे. जरांगे पाटील म्हटले की “अजित पवारांना म्हणावं एकदा या तरी, सात महिन्यांत एकदाही आले नाही.
तुम्ही मराठ्यांच्या लेकरच्या बाजूने बोलला पाहिजे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. आरक्षण घेऊन आले की गळ्यात उडीच हाणतो. अजित पवारांना कारवाई करू म्हणायची गरज काय होती ? त्यांनीच काडी लावून दिली. मात्र, अजित पवार आरक्षण घेऊन आले की मी त्यांच्या गळ्यातच उडी मारेल, असा चिपकुन बसेल निघणारच नाही.”
अस म्हटल आहे. दरम्यान मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे निघालेली ही पायी दिंडी आता येत्या काही दिवसात मुंबईला पोहोचणार आहे. ही दिंडी येत्या चार दिवसात मुंबईला पोहोचणार असून मराठ्यांच्या या मोर्चाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या मोर्चामध्ये हजारो, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सामील होत असून सरकार कुठेतरी बॅक फुटवर आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता शासनाच्या माध्यमातून या मुद्द्यावर काय निर्णय घेतला जातो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.