Ahmednagar News : हिवरे बाजार या गावाने रामराज्यातील ग्रामराज्य साक्षात उभे केले आहे. प्रभू रामांचा वनवासात जास्त काळ गेला त्यामुळे त्यांना वनात पशु, पक्षी, प्राणी, वन्यजमाती, नद्या या सर्वांना बरोबर घेऊन रामराज्य उभे केले.
प्रभू रामांच्या राज्यात पाणी ही कुठलीही समस्या नव्हती. आणि त्याच प्रकारचे ग्रामराज्य हिवरे बाजारने उभे केले आणि ते उभे करणारे तुमचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अयोध्येमध्ये साक्षात श्रीरामप्रभू रामचंद्राच्या जन्माचे साक्षीदार आहेत.

तुम्ही सर्व भाग्यवान आहात कारण तुम्ही हिवरे बाजारमध्ये जन्माला आलात. १४० कोटीच्या लोकसंख्येत अवघ्या ७००० व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले. हे अनेक पिढ्यांचे मागचे पुण्य आणि भविष्यकाळातील कित्येक पिढ्या सूर्य चंद्र असेपर्यंत नावे काढतील.
माणूस जन्माला आला कि राम हातात येतो आणि मरताना सुध्दा राम राम म्हणतच जावे लागते. असे मत ह.भ.प.यशवंत महाराज थोरात यांनी कीर्तनप्रसंगी व्यक्त केले.
श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या निमित्त आदर्श गाव हिवरे बाजार येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी कृष्णकृपांकित ह.भ.प.विकासानंद महाराज मिसाळ यांचे हस्ते श्रीरामांचा ध्वजारोहण, त्यांनतर श्रीरामप्रभू रामचंद्रांच्या जयघोषात संपूर्ण गाव प्रदक्षिणा आणि त्यानंतर कीर्तन ,आरती, स्नेहभोजन व रात्री भजन संगीत झाले.