Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीचे आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेरचे विक्रमी उत्पन्न २ कोटी ४३ लाख झालेले असून ७२ लाख नफा झालेला आहे.
श्रीरामपूर बाजार समितीचे कामकाज अतिशय पारदर्शी, काटकसरीने व चांगल्या प्रकारे चालू असल्याचे बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे आणि संचालक मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, येथील श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक (दि.३०) मार्च २०२३ रोजी होवून (दि.१३) एप्रिल २०२३ रोजी नविन संचालक मंडळ अस्तित्वात आले असून सभापती सुधीर नवले यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे कामकाज चालू आहे. माजी आ. भानुदास मुरकुटे व युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर बाजार समितीचे काम सुरू आहे.
सभापती व संचालक मंडळाने २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ रुपयाचे मुळ अर्थसंकल्प तयार करून शासनाला सादर केला आहे. माहे डिसेंबर २०२३ अखेर श्रीरामपूर बाजार समितीस एकूण उत्पन्न २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० इतके उत्पन्न झाले असून ७१ लाख ७० हजार ५८२ इतका नफा झालेला आहे.
श्रीरामपूर बाजार समितीने आपल्या बजेट मध्ये मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख तसेच उपबाजार आवारात १ कोटी ९५ हजाराची नियोजित बांधकामे धरलेली आहेत. तसेच एक नविन उपबाजार निर्मिती करण्याचा नियोजित आहे.
टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणी करणे तसेच जनावरे बाजार वाढीसाठी प्रयत्न करण्यासह भाजीपाला, फळे विभागामध्ये शीतगृह उभारणी, नविन डाळींब मार्केट सुरू करणे व सदर कामे पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, असे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले.