Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. विविध नेत्यांनी आता निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. शिवाय महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये देखील लोकसभेच्या निवडणुकांसाठी जागा वाटपावर मंथन सुरू झाले आहे.
दरम्यान महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षांनी आता काही जागांवर दावा ठोकला आहे. खरंतर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदार संघ अशा दोन लोकसभेच्या जागा आहेत. यामधील शिर्डी लोकसभेची जागा भाजप-शिवसेना युती सरकार असताना शिवसेनेकडे होती.

या जागेवर शिवसेनेला विजय देखील मिळाला आहे. यामुळे त्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने आता महाविकास आघाडीमधून दावा केला आहे. तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघासोबतच नगर दक्षिण मध्ये देखील ठाकरे गटाने ताकद लावली आहे. यासाठी येत्या 28 जानेवारीला ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत हा मेळावा घेणार आहेत. दरम्यान याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आलेल्या ठाकरे गटातील जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी नगर दक्षिण जागेवर देखील दावा ठोकला आहे.
त्यांनी शिर्डी ची जागा आमच्याकडे असून नगर मधील तीन बडे नेते आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याने नगर दक्षिण जागेवर देखील आमचा दावा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. म्हणजेच नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाबरोबरच नगर दक्षिण मतदार संघावर देखील ठाकरे गटाने दावा केला आहे. सध्या स्थितीला नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे.
मात्र तरीही महाविकास आघाडी मधून ठाकरे गटाने या जागेसाठी उत्सुकता दाखवलेली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता जागा वाटपावरून चांगलाच गोंधळ होणार असे दिसत आहे. ठाकरे गटाने केलेला हा दावा महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दुसरीकडे सुनील शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसंबंधी देखील महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत नगर शहर व पारनेर या जागा पूर्वीपासून आम्ही लढवत आहोत. आता नगर जिल्ह्यातील अन्य जागांवरही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान श्रीरामपूरची जागा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.