Radhakrishna Vikhe Patil : संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करा

Published on -

Ahmednagar News : संत श्री ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा शहराला मोठे अध्यात्मिक महत्व आहे. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र देशाच्या मुख्य नकाशावर यावे यासाठी संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा सर्वसमावेशक असा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखड्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते. बैठकीस माजी आमदार तथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासा हे प्राचीन शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथ इथेच लिहिला. हजारो वर्षांची ऐतिहासिक, अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या या मंदिराचा सर्वंकष असा विकास आराखडा तयार करण्यात यावा. विकास आराखडा तयार करत असताना ग्रामस्थांच्या सूचनांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा.

प्रवरा नदीवर घाट तसेच सुशोभिकरणाचाही आराखड्यात समावेश करावा. अध्यात्मिक परंपरा असलेल्या नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने अध्यात्मिक विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागेची पाहणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले. बैठकीस अधिकारी, पदाधिकारी, देवस्थान समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe