Ahmednagar Politics News : आगामी लोकसभेसाठी आ.निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा नेहमीच होत असते. तर दुसरीकडे आ.राम शिंदे हे देखील लोकसभेला लढणार असे सांगत आले आहेत. दोघेही आमदार हे राजकीय दृष्ट्या विखे विरोधक म्हणून ओळखले जातात.
त्यामुळे विखेंविरोधात यांची टक्कर लोकसभेला असणार का? अशाही चर्चा होत असतात. दरम्यान आता नुकतीच प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाचा यात्रोत्सव नुकताच पार पडला. या यात्रेदरम्यान, भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांच्याबरोबर हजेरी लावली. त्यामुळे आ. लंके व आ. शिंदेची खंडोबावारी पुन्हा चर्चेत आली आहे.
आ. लंके यांनी आ. राम शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य करत मोहटादेवी गडावर दर्शन घेतले होते. दोघांनी एकमेकांच्या फराळाला देखील हजेरी लावली होती. त्यामुळे आ. लंके यांची जवळीक ही आगामी लोकसभा निवडणुकीची मैत्रीपूर्ण नांदी तर नाही ना अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
एकमेकांच्या कामांचे तोंडभरून कौतुक
यावेळी दोघांनीही एकमेकांच्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले. आ. लंके यांच्या माध्यमातून कोरठण खंडोबा गडावर विविध योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून विकासाचे परिवर्तन सुरू आहे असे वक्तव्य यावेळी आ. शिंदे यांनी केले आहे.
कोरठण खंडोबा देवस्थान गडावर वार्षिक यात्रोत्सवातील दुस-या दिवशी खंडोबा देवाची महाआरती व बैलगाडा घाटाचे पुजन आमदार शिंदे व आमदार लंके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
आमदार लंके म्हणाले, कोरठण खंडोबा देवस्थान आणि आमदार शिंदे यांचा जवळचा संबंध आहे.
पालकमंत्री पदावर काम करताना त्यांनी पर्यटन योजनेअंतर्गत सातत्याने निधी उपलब्ध करून देवस्थान विकासाची खरी पायाभरणी केली आहे. आज देवस्थानचे मोठे स्वरूप होत आसताना त्यांचे योगदान मोठे आहे असे ते म्हणाले.
दोन्ही आमदार कुणाची कुणाची तळी उचलणार?
प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवादरम्यान बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन शिंदे-लंके जोडगोळीने केले. या दोघांच्या हस्ते खंडोबाची तळी भरण्यात आली. आता आगामी निवडणुकीत भाजपचे आमदार राम शिंदे व आमदार निलेश लंके हे कुणाची तळी उचलणार? दोघांपैकी कोण उभे राहणार व कोण कुणाचे काम करणार अशी चर्चा सध्या रंगली आहे.