राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा – प्रतापराव ढाकणे

Ahmednagarlive24 office
Published:

विकासकामे करताना आम्ही जात, पंथ, धर्म व मतांची टक्केवारी पाहत नाही. ही शिकवण आमची आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले.

प्रत्येक गाव, वाडी, वस्तीला विकास निधी दिला. येळी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.

येळी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ढाकणे बोलत होते. येळेश्वर संस्थानचे प्रमुख रामगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी मा. जि. प. परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील, बोरुडे, वैभव दहिफळे, शंकर बडे, निळकंठ आव्हाड, दिलीप सोळसे, विष्णू थोरात, पांडुरंग कराड, आबासाहेब जायभाये, अनिल बंड, मल्हारी घुले, कालिदास गजें, शिवदास गजें, सुभाष गजें, सुनील ढाकणे, अनिल जाधव, अशोक ढोले उपस्थित होते.

या वेळी बोलताना ढाकणे म्हणाले, स्वार्थी राजकारणासाठी ढाकणे कुटुंबीयांनी कधीही आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. राजकारण करताना शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील जनतेमध्ये जातीभेद निर्माण केला नाही, लोकांमुळेच स्व. बबनराव ढाकणे दिल्लीत देशाच्या राजकारणात पोहोचले, त्याची जाणीव आम्हालाही आहे.

म्हणून मागील तीस वर्षांपासून मी दोन्ही तालुक्यांतील जनतेसाठी अविश्रांत कार्यरत आहे. राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा आहे. ज्या जनतेने आम्हाला सर्व काही दिले त्यांच्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील.

संघर्ष करणे हाच आणि अन्याय विरोधात उठाव निर्माण करणे हाच आमचा स्थायीभाव आहे. भविष्यात राजकीय दृष्टिकोनातून काहीही घडले तरी मी या वारशाला कधीही सोडणार नाही.

परिसरासाठी प्रभावती ढाकणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील पाच वर्षात एक कोटी पन्नास लाखांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. प्रास्ताविक शंकर बडे यांनी केले. विकी डमाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe