Maharashtra News : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना विनाकारण कायदेशीर नोटिसा पाठवून देत असलेला त्रास म्हणजे फॅसीस्ट राजकारण आहे. अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची राजकारणाशी असलेली सुसंस्कृती पायदळी तुडवली जात आहे.
हे दर्जाहिन व सुडाचे राजकारण असेच चालू राहिल्यास त्याविरुद्ध महाराष्ट्रभर पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
शरद पवार गटाच्या शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष लकी सेठी, अॅड. राजेश बोर्डे, बाळासाहेब उंडे, विश्वास वाघमारे, शफी शाह, अरबाज शाह, राजेंद्र सलालकर, गंगाधर सोनवणे, सर्जेराव देवकर, सुभाष घोगरे आदींनी याबाबत नायब तहसीलदार वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे यांना संपूर्ण कागदपत्र चौकशी व खुलासा देऊनही वारंवार त्रास देण्याच्या हेतूने खच्ची करण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत नोटिसा देण्यात येत आहेत.
त्यांना बजावलेल्या नोटिसांमधील विषयांवर त्यांनी वेळोवेळी चौकशीस उपस्थित राहून कागदपत्रे व खुलासा दिला असतानाही त्यांना नामोहरण करण्याच्या हेतूने वारंवार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात नोटिसा देऊन बोलवण्यात येते.
दिवस दिवस त्यांची चौकशी करून त्यांना कार्यालयात बसवून ठेवले जाते. हे अयोग्य असल्याचे म्हटले असून हे थांबले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.