१९३७ मध्ये गायब झालेले बेपत्ता विमान सापडले !

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : जगातील पहिली महिला पायलट अमेलिया इअरहार्ट चालवत असलेले विमान १९३७ मध्ये अचानक रहस्यमयरीत्या गायब झाले होते.

हे विमान प्रशांत महासागरात सापडल्याचा दावा अमेरिकेतील एका सागरी संशोधन डीप सी व्हिजन (डीएसव्ही) कंपनीने केला.

या विमानाची सोनार प्रतिमाही संबंधित कंपनीने प्रसिद्ध केली असून यात गायब झालेल्या विमानाचे अवशेष दिसत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

डीप सी व्हिजन (डीएसव्ही) या दक्षिण कॅरोलिनास्थित कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात बराच शोध घेतल्यानंतर ही सोनार यंत्रणेद्वारे विमानाची प्रतिमा टिपण्यात यश आले आहे.

अमेलिया इअरहार्टचे यांचे विमान १९३७ मध्ये प्रशांत महासागरात हॉलंड बेटाजवळ इंधन संपल्याने पडले होते. त्याच विमानाचे सोनार चित्र समोर आल्याचा दावा डीएसव्हीने केला आहे.

परंतु हे चित्र अतिशय अस्पष्ट असून कंपनीच्या पाणबुडीने १६ फूट खोलीवर साईड स्कॅन सोनारच्या मदतीने ही प्रतिमा टिपली आहे.

यात इअरहार्टच्या हरवलेल्या विमानाचा आकार दिसत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. डीएसव्हीचे मुख्य कार्यकारी टोनी रोमन्स म्हणाले की,

इअरहार्ट आणि नूनन यांनी विमान पाण्यावर हळूवार उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असेल, असा अंदाज बांधला जात होता,

आता सोनारमधून समोर आलेल्या चित्रांमधूनही असेच झाले असावे, असे म्हटले जात आहे. संशोधकांच्या पथकाने प्रशांत महासागरात ९० दिवसांपर्यंत १३ हजार ५०० चौरस किलोमीटरचा शोध घेतला असूनही आतापर्यंतची सर्वात मोठी सागरी शोध मोहीम असल्याचेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe