Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून आता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे.
बुधवारी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात भीषण अपघात झाला.
कारची अज्ञात वाहनास धडक बसून हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला.
यामध्ये अल्पेश दीपक गुरव व सचिन सोपान पाटील दोघे ठार झाले. कल्याणहून छत्रपती संभाजी महाराज खंडपीठात कामानिमित्त ते निघाले होते.
कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी अल्पेश दीपक गुरव व सचिन सोपान पाटील (वय ३०) हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात कामानिमित्त एमएच ०५ सीके ७०० क्रमांकाच्या कारने निघाले होते.
त्यांची कार समृद्धी महामर्गावरून जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात असताना समोर असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडकली.
या अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात अल्पेश गुरव व सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यवाही सुरु केली. नागरिकांनीही त्या ठिकाणी धाव घेत मदत कार्य केले.
दोघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आले. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया काल सायंकाळ पर्यंत सुरू होती.
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. मागील महिनाभराचा विचार करता अपघातांची संख्या व मृतांची संख्याही चिंताजनक आहे.
वाहने चालवताना ती सावकाश चालवीत, नियंत्रित राहतील अशा पद्धतीने वाहनाचा वेग असावा असे आवाहन करण्यात येत आहे.