Ahmednagar News : ज्यांना ४० वर्षांत करता आले नाही, ते मी चार वर्षांत केले, हे जनतेने पाहिले आहे. तेव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी उगाच आकांत तांडव करू नका.
जनतेची काळजी घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोल्हे यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला.
शुक्रवारी (दि. ९) कोपरगाव तहसील कचेरी येथील आढावा बैठकीत आमदार काळे बोलत होते. यावेळी बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभाचा आढावा घेऊन तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना केल्या.
आमदार काळे म्हणाले, ८११ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. लाभाथ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना सातत्याने पाठपुरावा करून आठ हजार पाचशे पस्तीस लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला.
विरोधकांना त्यांच्या पाच वर्षात केवळ दोन हजार लाभार्थ्यांनाच लाभ देता आला. या उलट मी चार वर्षात चारपट जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला.
चार वर्षात मतदारसंघासाठी २९०० कोटीचा निधी आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारा विकास विरोधकांना पाहवत नाही, त्यामुळे अस्तित्वाच्या भीतीने ते जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप आमदार काळे यांनी केला;
मात्र जनता त्यांच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही. नागरिकांकडून गतिरोधक करण्याची मागणी लक्षात घेता विकासाचा वेग वाढल्याचे लक्षन आहे. ५ नंबर साठवण तलावाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे हे काम होऊ नये, यासाठी दर दोन महिन्याला विरोधक न्यायालयात जात आहेत.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम ते करत आहेत. कारण प्रश्न सुटले तर आपले राजकारण संपेल, या भीतीपोटीच विरोधक सातत्याने आटापिटा करीत आहेत. विकासाच्या आड येणाऱ्यांच्या मनसुब्यावर जनताच पाणी फेरणार आहे.
येत्या काळात तीन हजार कोटीच्या पुढे जाणार असून सातत्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.