Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरचा अपघात झाला.
यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. त कार चालक उमेश उगले, राहुल श्रीमंत राजभोज (रा. निमखेडा, ता. जाफराबाद), भाऊसाहेब नामदेव पैठणे (रा. दहेगाव, ता. जाफराबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.
तर शिवहरी पांडुरंग वाघ (रा. टेंभुर्णी, ता. जाफराबाद) व रविंद्र मनसुखलाल फलके (रा. तपोवन, ता. जाफराबाद) हे गंभीर जखमी झाले
मयत कारचालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून तसेच रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत स्वतःसह तीघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मयत कारचालक उमेश दामोधर उगले रा. भातोडी, ता. जाफराबाद, जि. जालना याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील उमेश दामोधर उगले हे स्विफ्ट डिझायर कारमधून (एमएच २१ बीएफ ९२४८) मित्रांसमवेत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने येत होते.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर ५०४ जवळ असताना समोर असलेल्या कंटेनरला (एमएच ४६ एएफ ९८३३) पाठीमागून जोराची धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलीस उपनिरिक्षक समाधान भाटिवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
मृतांचे मृतदेह शुक्रवारी रात्री शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणले . शवविच्छेदन व इतर प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर शनिवारी दुपारी दिड वाजता तीघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
याप्रकरणी दत्तात्रय रामदास सवडे (रा. नांदखेडा, ता. जाफराबाद, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून मयत कारचालक उमेश उगले विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.