डॉ. सुजय विखे यांच्यापुढे आ. राम शिंदे यांचे आव्हान; नगर दक्षिणसाठी अजून भाजपाचा उमेदवार निश्चित नाही, यादीत माझही नाव, शिंदे यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात संपूर्ण देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार असा अंदाज आहे. म्हणजेच आता अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे आता सर्वत्र राजकीय सनई-चौघडे वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अहमदनगरमध्ये मात्र दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड घडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. प्रामुख्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण अधिक ढवळले गेले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

खरेतर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहेत. एक जागा शिर्डीची आणि दुसरी जागा ती नगर दक्षिणची. यातील नगर दक्षिण या मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर सुजय विखे हे खासदार म्हणून 2019 ला निवडून आले आहेत. वास्तविक, या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा कब्जा आहे.

2019 ला डॉक्टर सुजय विखे हे निवडून येण्याआधी या जागेवर दिलीप कुमार मनसुखलाल गांधी यांनी तीन पंचवार्षिक या जागेवरून निवडून येण्याचा भीष्म पराक्रम केला होता. सर्वप्रथम ते 1999 मध्ये या जागेवरून खासदार बनलेत. यानंतर 2009 मध्ये 15 व्या लोकसभेत या जागेवरून खासदार बनलेत. तसेच 2014 मध्ये पुन्हा ते या जागेवरून खासदार म्हणून संसदेत गेलेत.

2019 मध्ये मात्र, भारतीय जनता पार्टीने त्यांना आराम दिला आणि वेळी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये आलेल्या डॉक्टर सुजय विखे यांना या जागेवरून उमेदवारी मिळाली आणि डॉक्टर सुजय विखे यांना या जागेवरून चांगल्या मताधिक्यांनी विजय मिळाला. दरम्यान, आता लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. या जागेवर भाजपाचे प्राबल्य पाहता नगर दक्षिणच्या जागेसाठी महायुती मधून भाजपाचा उमेदवार या जागेवर उभा राहणार हे जवळपास ठरलेले आहे.

हेच कारण आहे की, वर्तमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या मतदारसंघात चणाडाळ आणि साखर वाटपाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. साखर वाटपातून त्यांनी मत पेरणी सुरू केली असून या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली पाहिजे यासाठी पक्षावर इनडायरेक्ट दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

मात्र असे असेल तरी सुजय विखे पाटील यांना स्व पक्षातून आणि महायुती मधील इतर घटक पक्षातून मोठे आव्हान मिळू लागले आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

याशिवाय त्यांच्याच पक्षातील विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा विखे यांना आव्हान दिले आहे. खरे तर सध्या भाजपाचे घर चलो अभियान सुरू आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जनसंपर्क वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. काल अर्थातच शनिवारी आमदार राम शिंदे हे देखील घर चलो अभियान अंतर्गत सावेडी येथील प्रेमदान हडको परिसरात जाऊन नागरिकांच्या भेटीघाठी घेतल्यात. यावेळी त्यांनी नागरिकांना मोदी सरकारच्या योजनांबाबत माहिती देखील दिली.

यावेळी आमदार राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली शिवाय त्यांनी यावेळी विखे यांना देखील घरचा आहेर दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण हे आज सांगता येणार नसल्याचे आमदार राम शिंदे यांनी नमूद केले.

राज्याचे पार्लमेंटरी बोर्ड त्यावर चर्चा करून केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवणार आहे, मग तेथून उमेदवारी जाहीर होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर आमदार राम शिंदे यांनी मी नगर दक्षिणेतून लढण्यास इच्छुक असल्याचे मागेच सांगितले आहे व त्या यादीत माझे नाव आहे, असेही सांगितले. देशात आता रामराज्य आले आहे व नगर जिल्हा देशातच असल्याने येथेही रामराज्य आले आहे, असे सूचक विधान यावेळी शिंदे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe