Ahmednagar Crime : उसने दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने लक्ष्मण धनवडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
तालुक्यातील मुसळवाडी येथे नुकतीच ही घटना घडली. या घटनेबाबत रविंद्र करपे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लक्ष्मण चिमन धनवडे व रविंद्र सखाहरी करपे हे दोघे भागीदारीत जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. ९ वर्षापूर्वी लक्ष्मण धनवडे यांनी भिसीचे ५ लाख रुपये रविंद्र करपे यास उसने दिले होते.
धनवडे यांनी घराचे बांधकाम सुरु केले होते. तेव्हा धनवडे यांनी करपे पैशाची मागणी केली. तेव्हा तो म्हणाला की, आता माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही घरबांधणी करीता १० लाख रुपयाचे घरकर्ज करा.
त्यातले ५ लाख रुपये तुम्ही घर बांधणीकरीता ठेवा व उर्वरीत ५ लाख रुपये मला द्या. पुर्वी घेतलेले ५ व घरकर्ज मधील ५ लाख रुपये, असे एकुण १० लाख तुम्ही घेतलेले कर्ज आपण स्वतः हप्त्याने परतफेड करू त्यानंतर रविंद्र करपे याने घरकर्जाचे हप्ते भरण्यास व उसने घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.