सलग दुसऱ्या दिवशी लोणीत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकला !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वनखत्याला आहे.

काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेजलगत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतिक गजेवार, घटनास्थळी पोहोचले व कोपरगावच्या वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना माहिती देण्यात आली.

रविवारी मध्यरात्री एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याच मकाच्या शेतात दुसरा बिबट्या आढळला. एकाच ठिकाणी दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरात आणखी किती बिबटे अधिवास करून आहेत, याचा आकडा सांगणे कठीण बनले असून या परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत.

डॉ. सुनील आहेर, अजय बोधक, अनिल जाधव, अमोल ब्राम्हणे, नानासाहेब ब्राम्हणे, सुधीर ब्राम्हणे, दशरथ सोनवणे, मंडू खेमनर यांनी वनखात्यास मदत केली. लोणी, बाभळेश्वर, कोल्हार भगवतीपूर परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे.

रोजच शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून बिबट्या त्यांना फस्त करीत आहे. वनखाते बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी कंबर कसून काम करीत आहे; मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील बिबटे कसे जेरबंद करावे, याचे आव्हान वन खात्यासमोर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe