Loksabha 2024 : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. महायुतीत गृहमंत्री खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून,
ते उत्तम पद्धतीने गृहखात्याचा कारभार सांभाळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केला. त्याचबरोबर पक्षनेतृत्वाचा आदेश जबाबदारीने पार पाडू, असे मार्मिक भाष्यही त्यांनी केले.
निलेश लंके मित्र मंडळाच्यावतीने नगरमध्ये १ ते ४ मार्च दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
या महानाट्याची सविस्तर माहिती आ. लंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी अगदी मोजक्या शब्दातच लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.
तुम्ही साधेपणाचा आव आणत आहे, असा आरोप होत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मी अगदी छोटा कार्यकर्ता आहे, ते मोठे आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यांनी राजकारण केले आहे.
माझ्यासारख्या छोट्या माणसाने त्यांच्यावर बोलणे योग्य होणार नाही, अशी कोपरखिळी आ. लंके यांनी खा. सुजय विखे यांना त्यांचे नाव न घेतला मारली. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिले जाते, असे विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवला,
मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, तो जबाबदारीने पार पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी सविस्तरपणे दिली.