Ahmednagar News : रुमचे भाडे दिले नाही, म्हणून रूममेटनेच राहात्या घरी ७४ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून शहरासह परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.
आरोपी धर्मेंद्र मेहता यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी शहरालगत असलेल्या देशमुख चारी येथील वसाहतीत,
श्रीनिवास शेसा शेट्टी (वय ७४, रा. माटुंगा, मुंबई, हल्ली मुक्काम शिर्डी) व धर्मेंद्र मनोहर मेहता (रा. शिर्डी, वय ४०) हे दोघेही रूम भाड्याने घेऊन राहात होते.
श्रीनिवास शेट्टी यांनी रुमचे भाडे न दिल्याने धर्मेंद्र मेहता आणि त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यादरम्यान रागाच्या भरात मेहता याने शेट्टी यांचे डोके भिंतीवर जोरजोराने आपटले.
यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्या स्थितीत शेट्टी यांना उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपाधिभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, सहाय्यक फौजदार संतोष पगारे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी घरकाम करणाऱ्या अलका बाबासाहेब चव्हाण (वय ४२, रा. देशमुख चारी, निमगाव, ता. राहाता) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून
आरोपी धर्मेंद्र मनोहर मेहता याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करत आहेत.