Maharashtra Police : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची हिंमत दाखवतो, तर कोकणातील मंत्री नारायण राणेंचे पुत्र पोलिसांची अब्रू वेशीवर टांगत आहे.
गृहविभाग व पोलीस खात्याची प्रतिमा धुळीस मिळाली असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शिडींत आयोजित पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सपना मोरे, नाना बावके, अमोल गायके, सुनील परदेशी, सुहास वहाडणे, संजय शिंदे, स्वाती परदेशी, सचिन चौगुले, भागवत लांडगे यांच्यासह महिला आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
अंधारे म्हणाल्या, की छत्रपतींचे नाव घेऊन राज्य कारभार सांभाळणाऱ्या राज्य सरकारने छत्रपतींच्या विचारांना पायदळी तुडवले आहे. राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळावी, यासाठी राणे पिता-पुत्रांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत.
पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणारी विधाने राणेंचे पुत्र रोज करत आहेत. राडा संस्कृती शिवसेनेसाठी नवी नाही. यापुढे चिथावनीखोर भाषा राणे पिता पुत्रांनी थांबवली नाही, तर शिवसेना राणेंना राज्यात फिरकू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याचा अधिकारच नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छाशक्ती असेल, तर केंद्र सरकारने कायदा करून टिकणारे आरक्षण दिले पाहिजे. राज्य सरकारने दिलेले आरक्षण मराठा समाजाची फसवणुक करणारे आहे.
नगर जिल्ह्यातील प्रश्न ठाकरे शिवसेनेच्या अजेंड्यावर असून या प्रश्नांवर शिवसेना भविष्यात आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडणार आहे.
कांद्यावरील निर्यात बंदी केंद्राने उठवली, तरी कांद्याला भाव नाही. यावेळी पुंडलिक बावके, विश्वजीत बागुल, दिनेश शिंदे, मयूर शेरवेकर, ऋषिकेश मते, कैलास शिंदे व आदी शिवसैनिक उपस्थित होते.