आंबा बागायतदारांना आंबा थेट ग्राहकांना विकता येणार !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : आंबा बागायतदारांना आपल्या मालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चालू हंगामाकरिता आंबा उत्पादकांना आंबा विक्रीकरिता पुणे आणि राज्यातील, परराज्यांतील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. यातून दरवर्षी २१ हजार मेट्रिक टन इतके उत्पादन अपेक्षित असते. यंदाही बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला डिसेंबर महिन्यात अधूनमधून होणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे बागायतदार त्रस्त होता.

त्याच काळात आंब्याच्या झाडांवर मीजमाशी आणि शेंडेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन कीड व रोगांपासून आंबा पिकाचे संरक्षण करण्यासाठी बागायतदारांनी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून घेतली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा आंबा उशिरा बाजारात येत असतो. तरीही यंदा फेब्रुवारीच्या पहिल्याच तारखेला अलिबागचा आंबा वाशी बाजारात दाखल झाला.

त्याला भावही चांगला मिळाला. तसे पाहिले तर यंदाच्या हंगामात अजूनपर्यंत तरी आंब्याच्या पिकाला निसर्गाचा फार मोठा फटका बसल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे.

शासनातर्फे बागायतदारांना आंबा विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील दलालांची साखळी तुटणार असून त्याचा फायदा उत्पादक आणि ग्राहकांना होणार आहे.

कशी कराल स्टॉल नोंदणी?
स्टॉल नोंदणीकरिता आंबा नोंदीसह ७/१२ उतारा (मागील ६ महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नावे १० हजार रुपये अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र आदी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.

इच्छुक बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी आवार, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी अथवा कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ पवन बेर्डे यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषी पणन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe