Ahmednagar News : शासनाची कुठलीही परवानगी न घेता सरकारी जागेतून बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन करून त्याची विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने
तालुक्यातील कुरण येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांना तहसीलदार धीरज मांजरे यांनी तब्बल १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन करून विक्री केली जात होती. ग्रामपंचायत हद्दीमधील गट नंबर गट नं. २५७ या सरकारी जागेमध्ये सन २०२१ ते २०२३ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन करण्यात आले.
ही जागा सरकारी मालकीची असल्यामुळे कुरण ग्रामपंचायतीने रीतसर सरकारी भरणा करुन मुरुम व इतर गौण खनिज उत्खनन करणे गरजेचे होते; मात्र ग्रामसेवक गंगाधर राऊत व सरपंच सय्यद मुदसिर मन्सूर यांनी तसे केले नाही.
त्यांनी सरकारी कायद्याचे उल्लंघन करुन ग्रामसेवक व सरपंच या नावाने स्वतः चलन तयार करुन त्याचा भरणा केला व सदर गट नं. २५७ मध्ये प्रमाणापेक्षा जास्त व बेकायदेशीर उत्खनन केले.
याबाबत कुरण गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख गफ्फार सत्तार यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे दि. ६ मार्च २०२३ रोजी तक्रार अर्ज केला.
कुरण ग्रामपंचायत गट नं. २५७ मधील बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा रीतसर पंचनामा व मोजणी करण्यात यावी,
यात दोषी अढळणाऱ्या व बेकायदेशीर चलन बनवणाऱ्या अधिकारी व सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच बेकायदेशीर गौण खनिज व मुरुम उत्खनन केल्या प्रकरणी शासन नियमानुसार दंड करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
गफार शेख यांच्या तक्रार अर्जाची महसूल अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत त्यांनी दिनांक १८ मे २०२३ रोजी तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला होता. यानंतर तहसीलदारांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीनंतर सरपंच व ग्रामसेवकांनी खुलासा केला होता.
आपल्या विरुद्ध तक्रार ही राजकीय आकसापोटी केली असून ग्रामपंचायतीने कोणतेही मुरुम या गौणखनिजाचे उत्खनन केलेले नाही. त्यामुळे ही तक्रार पुर्णतः खोटी आहे. तसेच गट नं २५७ मधील ८४ ब्रासचा केलेल्या खडडयाचा पंचनामा हा पुर्वीचाच आहे.
त्याच्याशी ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही. हा पंचनामा तक्रारदाराच्या नातेवाईक यांनी बनवुन शासनाची दिशाभुल केली असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. तहसीलदारांनी हा खुलासा अमान्य केला.