Ahmednagar News : अहमदनगरमधील काही घटना ताजा असतानाच आता आज पुन्हा एक अपघात झाला असून २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय.
राहुल मोहन घुसाळे (रा. नागरदेवळे, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या सिटी लॉनमधून नगरच्या दिशेने मोटारसायकलवर येत असलेल्या २९ वर्षीय युवकाच्या मोटारसायकलला महापालिकेच्या पुढे असलेल्या बीटीआर गेटसमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने जोराची धडक दिल्याने या हा अपघात घडला.
यात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत राहुल घुसाळे याच्या चुलत भावाचे शनिवारी (दि. २४) छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या सिटी लॉन मध्ये लग्न होते.
शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी तेथेच हळदीचा कार्यक्रम असल्याने तो मोटारसायकल वर तेथे गेला होता. हळदीचा कार्यक्रम व त्यानंतर जेवण व इतर कार्यक्रम उरकून तो पहाटे २ च्या सुमारास घरी जाण्यासाठी मोटारसायकल वर निघाला.
नगरच्या दिशेने येत असताना बीटीआर गेट समोर त्याने मोटारसायकलचा वेग कमी केला असता त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
त्या धडकेत तो मालट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मयत झाला. अपघाताची माहिती मिळताच भिंगार पोलीस स्टेशनचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.
त्यांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात शासकीय मृत्यूची नोंद केली असून घुसाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, २ विवाहित बहिणी, चुलते, पुतणे असा परिवार आहे.