Havaman Andaj : महाराष्ट्रात एकीकडे तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. दरम्यान या संमिश्र वातावरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
खरेतर आधी देखील महाराष्ट्रात अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागातील जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांसहित विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये 29 फेब्रुवारी पर्यंत ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता आहे.
एवढेच नाही तर खानदेशसहित मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आगामी दोन दिवस ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
याबाबत आयएमडी कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रमधील खान्देश विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर या दोन जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यात फक्त दोन दिवस ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत खानदेशसहित मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
यामुळे तेथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. खरे तर सध्या स्थितीला संक्रमणाचा काळ असून ही परिस्थिती पूर्व मौसमी हंगामातील पावसासाठी अनुकूल राहते.
हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे पर्व सुरू झाले आहे. एकंदरीत सध्या पूर्व मोसमी पाऊस बरसण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली असून याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.