Nilwande Water : निळवंडे धरण प्रकल्प आपण पुर्ण केला असून आता कालव्यातून पाणी आले, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आंनद निर्माण झाला आहे. निळवंडे धरणाचे पाणी वंचित गावांना मिळावे,
यासाठी ‘हरिपुरा पॅटर्न’ राबविण्यासाठी आपण आग्रही असून आपला प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आ.बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर एका कार्यक्रमप्रसंगी आमदार थोरात बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, माजी सरपंच सोपानराव जोंधळे, नानासाहेब जोंधळे, अशोक जोंधळे,
सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे, राधाकिसन जोंधळे, बाळासाहेब भडांगे, सूर्यभान भडांगे, राजू भडांगे, नागेश यादव, संजय यादव, कचरू यादव यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आ.थोरात म्हणाले, जलशुद्धीकरण प्रकल्पातून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी सर्वांनी या प्रकल्पाचा चांगला उपयोग करून घ्यावा. मोठ्या प्रतीक्षेनंतर निळवंडेचे पाणी तळेगाव भागात आले आहे.
हे काम कुणी केले सर्वांना माहिती आहे. मात्र काही भाग या पाण्यापासून वंचित राहिला आहे. निळवंडे धरणाचे पाणी वंचित गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपुरा पॅटर्न’ राबविण्यासाठी आपण आग्रही आहोत.
वडगावपान गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सहा लाख रुपये निधीचा कौठेकमळेश्वर गावांतर्गतच्या यादव वस्ती येथे जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
पाणी वाढावे, यासाठी परिसरातील विहिरींना आडव्या कुपनलिका घेण्यात आल्या आहेत. प्रास्ताविक सोपानराव जोंधळे यांनी केले. सोमनाथ यादव यांनी सूत्रसंचालन केले.